संंस्थापक

अनंंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल , मालवण या  संंस्थेचे संस्थापक

कै. कृष्णराव सीताराम ऊर्फ आबासाहेब देसाई‌ :‌‌-  

कै. आबासाहेब देसाई यांचा मालवणांतील प्रसिध्द देसाई घराण्यामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील श्री. सीतारामपंत देसाई हे एक  प्रसिध्द वकील होते. आबासाहेबांना सार्वजनिक कार्याची स्वभावतःच आवड होती व त्या दृष्टीने लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष, ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांनी तळमळीने कार्य केले. पुढे कै. बाबासाहेब वराडकर, कै. भाऊसाहेब आजगांवकर, कै. रा.ब.अच्युतराव देसाई व मालवणचे डॉ. रा.वा. आजगांवकर यांच्या सहकार्याने त्यांनी टोपीवाला हायस्कूलची स्थापना तारीख 10 एप्रिल 1911 रोजी केली. कै. भाऊसाहेब टोपीवाले यांजकडून दहा हजार रूपयांची पहिली देणगी मिळविणारांत ते प्रमुख होते. या हायस्कूलच्या सुरूवातीला सुपरिन्टेन्डेन्ट म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. पुढें अनेक वर्षे सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे ते एक प्रमुख सभासद होते. पुढे त्यांनी मालवणांत स्त्री- शिक्षणासाठी ‘कन्या शाळा’ ही माध्यमिक शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याकरिता त्यांना अविश्रांत श्रम घेऊन त्या संस्थेस त्यागपूर्वक वाहून घेतले. त्यांच्या स्त्री-शिक्षण विषयक बहुमोल कार्यामुळे त्यांना ‘कोकणचे कर्वे’ असे नामभिमान मिळाले. त्यांच्याच प्रयत्नामुळे कै. रा.वि.परूळेकर, एम. ए. हे त्यावेळी टोपीवाला हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून लाभले. त्याचे बंधू अनंतराव देसाई हे मोठे विदयाव्यासंगी असून त्यांनी संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषेंतील अनेक ग्रंथ संग्रहित केले होते. तो बहुमोल ग्रंथ-संग्रह आबासाहेबांनी टोपीवाला हायस्कूलला देणगीदाखल दिला.

 

कै. बाबुराव ऊर्फ बाबासाहेब वराडकर

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशंकात मालवणांत जे पदवीधर आले, त्यांमध्ये या ठिकाणी नवीन हायस्कूल स्थापन करण्यांचे ध्येय नजरेसमोर ठेवून अत्यंत धडाडीने व चिकाटीने ज्यांनी कार्य केले, त्यांत कै. बाबासाहेब वराडकर हे अग्रेसर होते. रूबाबदार शरीरयष्टी, अचूक दूरदृष्टी, अचल ध्येयनिष्ठा, खानदानी घराण्यांत जन्म यामुळे त्यांना या भागात एक विशेष दर्जा प्राप्त झाला होता.

लक्ष्मी व सरस्वती यांचे क्वचितच आढळणारे साहचर्य त्यांच्या ठिकाणी होते, त्यांमुळे त्यांच्या कर्तृत्वाला विशेष उजाळा आला होता. त्यांची शिक्षणविषयक तळमळ, धडाडी व निर्भयता यामुळे हायस्कूल-स्थापनेचे कार्य यशस्वी झाले. हायस्कूल चालविण्यासाठी मध्यवर्ती जागा व इमारती उपलब्ध होईपर्यंतच्या प्रारंभीच्या पांचसहा वर्षात कै. बाबासाहेब वराडकर यांनी अनेक लोकांचे आपुलकीने सहकार्य मिळवून शाळेला सुस्थिती प्राप्त करून दिली. यांत त्यांचे संघटना-चातुर्य व कार्यक्षमता हे गुण प्रामुख्याने दिसून येतात.

 

कै. विनायक वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब आजगांवकर

कै. भाऊसाहेब आजगांवकर यांचे वडील मोठे सरकारी अधिकारी होते. मुंबई विश्वविद्यालयाची बी. ए. ची पदवी घेतल्यावर कै. बाबासाहेब वराडकर यांना हायस्कूल – स्थापनेच्या कामांत सहकार्य देऊन शैक्षणिक कार्यास त्यांनी आमरण वाहून घेतले. प्रेमळ व गोड स्वभाव, आनंदी वृत्ती, उदार अंतःकरण व शिक्षणविषयक तळमळ हे त्याचे गुण संस्थेच्या भरभराटीस कारणीभूत झाले. साधी राहणी, उच्च विचारसरणी व मुलांशी समरस होण्याची वृत्ती यामुळे शाळेत व शाळेबाहेरही ते फार लोकप्रिय झाले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असूनही त्यांना विदयादानाच्या कष्टतर कार्यास वाहून घेतले, यात त्यांची ध्येयनिष्ठा व स्वार्थत्यागी वृत्ती दिसते. कित्येक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांस त्यांनी प्रसंगी आर्थिक मदतही केली होती.

 

डॉ. राजाराम वासुदेव आजगांवकर

डॉ. रा.वा. आजगांवकर हे या प्रांतातील एक नांवाजलेले भिषग्वर आहेत. यांनी आपले ज्येष्ठ बंधू कै. भाऊसाहेब आजगांवकर, यांच्याशी व कै. बाबासाहेब वराडकर व कै. आबासाहेब देसाई यांच्याशी समरस होऊन हायस्कूल-स्थापनेच्या कार्यात बरीच मदत केली. त्यांनी या शाळेत प्रथमोपचाराचे वर्ग चालविणें, विदयार्थ्यांना शरीरविज्ञान व आरोग्यशास्त्र हे विषय शिकविणे व विदयार्थ्यांची वैदयकीय तपासणी करणे वैगरे कामे आपुलकीने व विनावेतन केली आहेत. स्वभावतच डॉक्टरसाहेब रसिक व कलाप्रेमी असल्यांमुळे शाळेंतील स्नेहसंमेलनादि कार्यक्रमांमध्ये ते विदयार्थ्यांना आपुलकीने योग्य ते मार्गदर्शन करीत.

निरनिराळया प्रसंगी योग्य सल्ला देऊन त्यांनी बहुमोल मदत केलेली आहे. कै. आबासाहेब देसाई यांनी स्थापन केलेल्या महिला विदयालयात व इतर संस्थात त्यांनी विनावेतन अनेक वर्षे शिक्षणकार्य केले आहे.